img
img
Share On Facebook

मानवी विकासात शिक्षण आणि शिक्षकांचं महत्व हे अन्यसाधारण आहे.कोरोना या जागतिक महामारीच्या काळात आॅनलाईन/ डिजीटल शिक्षणा वर भर देण्यात येत आहे. आॅनलाईन हे म्हणायला फार सहज सोप्पं पण प्रत्येक्षात हे शिक्षकांसाठी ही आव्हानात्मक ठरत आहे.शिक्षक दिनाच्या औचित्यावर भारतसत्ताने शहरी,निमशहरी,ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करत असलेल्या शिक्षकांकडून ONLINE येत असलेल्या OFLINE समस्यांबाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

गावात वीज आहे पण वीज कधीच नसते

मोबाईल नाही,टीव्ही नाही इथला आदिवासी आपला उदरनिर्वाह जंगल आणि भातशेती,शिकार यावर करतो.रस्ता नाही.पावसाळ्यात चार महिने गावाचा इतर गावांशी संपर्क नाही.बरचसे पालक अशिक्षित आहेत शासकीय योजना काही पोहचतात काही पोहचत नाहीत.गावात कुठलीही सोय किंवा योजना नाही दवाखाना नाही दुकान नाही.शिक्षक राहण्यास सोय नसल्यामुळे शेजारच्या गावात राहतात.ऑफलाईन शिक्षण सुरू आहे पण काही पालक भीतीपोटी मुलांना शिक्षकांजवळ पाठवत नाहीत अशी परिस्थिती थोड्याफार फरकाने सर्वच तालुक्यातील आहे.काही ठिकाणी चांगल्याप्रकारे काम चालू आहे.ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन तयार झालेला पालघर सर्वात दुर्गम मोखाडा तालुका आहे.

अजितकुमार प्रभाकर संगवे शिक्षक जि.प.प्राथमिक शाळा. घोडापाडा.केंद्र-बेरीस्ते. ता.मोखाडा,जिपालघर.

फक्त २५ ते ३० टक्के पालकांजवळ आहेत स्मार्टफोन.

सद्या कोविड १९ च्या जागतिक महामारीमुळे जग थांबले आहे. शाळा,कॉलेज बंद आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांनी शाळा नव्हे तर शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची तयारी दाखवली आहे.आम्ही शिक्षकही नवीन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सजग आहोत.मागील मार्च महिन्यापासून आजतागायत आम्ही व्हाट्सअप्प ग्रुप,झूम मीटिंग च्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,पण फक्त २५ ते ३० टक्के पालकांजवळ स्मार्टफोन आहेत.त्यामुळे ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणाची उपकरणे नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक आपल्या दारी,ओट्यावरची शाळा,अंगणातील शाळा,घर घर पाठशाळा असे उपक्रम राबवून विद्यार्थी मित्र,कोरोना कॅप्टन यांच्या सहकार्याने ऑफलाईन शिक्षणाचा पर्याय शोधला.
सद्यायाला पालक व विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. आवश्यक ती सावधानता बाळगून सामाजिक व शारीरिक अंतर सांभाळून अभ्यास तपासला जातो व पालकांच्या समक्ष प्रत्यक्ष मार्गदर्शनही केले जात आहे.सध्या शाळा बंद पण शिक्षण सुरू ही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेची अभ्यासमालिका दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलवरील टिलिमिली कार्यक्रम दाखवून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही शिक्षण पध्दतीने कानेगावात शिक्षण सुरू ठेवले आहे.

सुशीलकुमार पांचाळ. राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कानेगाव.ता.शिरूर अनंतपाळ.

प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचेल असे वाटत नाही.

ऑनलाईन शिक्षण हा सध्याचा सर्वात अडचणीचा विषय ठरत आहे.ग्रामीण भागातील पालकांसाठी तर तो आणखीन अवघड ठरत आहे.कोरोनामुळे सध्या सर्व शाळा,महाविद्यालय बंद करण्यात आली.विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये,त्यांचे वर्षे वाया जाऊ नये यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला.ज्या मोबाईल शाळा,महाविद्यालयमध्ये बंदी होती तोच मोबाईल शिक्षणाचा पर्याय ठरला पण खरच हे ऑनलाईन शिक्षण यशस्वी ठरू शकेल का ? हा प्रश्न मात्र कायम आहे.शिक्षण विभागाने प्रत्येक वर्गाचे व्हाटसअँप ग्रुप तयार करायला सांगितले.दिक्षा अँपचा वापर सांगितला पण हे सगळे करण्यासाठी मोबाईल हा हवाच हिच मोठी अडचण पालकांच्या समोर उभी राहिली.कोरोनामुळे बऱ्याच पालकांचा कामधंदा बुडाला त्यांना दोन वेळचे जेवण मिळण्यास अडचणी येतात त्यात मोबाईल कुठून घेणार ?

लहान मुलींना वर्गात किती वेळा तरी समजावल तर त्यांना समजत नाही.तर ह्या ऑनलाईन शिकवणी त्याच्या गळी काय उतरणार ? मोठया वर्गाच्या मुलींच्या पालकांनी अनंत अडचणीतून मोबाईल घेऊन दिला.पण हे सगळ्यांना शक्य नाही.म्हूणन ऑनलाईन शिक्षण हा पर्याय 100% यशस्वी होणार नाही.25% पालकांकडे ही मोबाईल नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचेल असे वाटत नाही.तरी ही शिक्षक ऑनलाईन शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यानां ऑफलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. जमेल तसे प्रत्येक मुल शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी शाळा तयारी करत आहेत.

सौ.अर्चना कांबळे.सहशिक्षक जिल्हा परिषद प्रा.कन्या शाळा. देवणी.जि.लातूर.

ना रस्ता ना रेंज.

असेही काही ठिकाण आहेत,जेथे ना मोबाईलला रेंज येत ना जायला रस्ता ना शिक्षकाला राहयची सोय,तरीपण शिक्षक ड्युटी करत आहेत पण एवढं करूनही,विध्यार्थ्यांना शिकवणे सोपे काम नाही.आज आम्ही ज्या ठिकाणी काम करतोय तो भोगोलिक दृष्टीने अतिशय दुर्गम असून भोर पासून 60 km अंतरावर डेरे या गावी मी नोकरी करतो.तेथे कोणत्याही मोबाईल ला रेंज नसून,ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया मनात असूनही राबवू शकत नाही पण आम्ही त्यातून मार्ग काढला आहे.विद्यार्थी शिकला पाहिजे हा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन प्रयत्न सुरू आहेत व त्यात यश येत आहे.त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागत आहेत.भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्याने खुप अडचणी चा सामना करावा लागतो कधी कधी घाटात दरड कोसळते तर कधी कधी रस्त्यावर मोठे साप पडतात पण सर्व परिस्थिती चा सामना करत ज्ञानदानाचे काम सुरूआहे याचे समाधान नक्की आहे.

सूर्यवंशी ओम पंडितराव उपशिक्षक,जिल्हा परिषद प्रा.शाळा डेरे ता.भोर जि.पुणे

नैतिक मुल्यांची जोपासना या शिक्षणाद्वारे होऊ शकत नाही.

भारतीय संस्कृतीत गुरू शिष्य परंपरा चालत आली आहे. गुरूशिवाय मार्ग नाही.या उक्तीची आज ऑनलाईन शिक्षणपद्धतीने जणू थट्टाच मांडली आहे.मान्य आहे,आज कोरोना महामारीने थैमान घातले आहे.सामाजिक व्यवस्थापन ठप्प झालेले आहे.त्यात काही आवश्यक सेवा पुरविल्या जात आहेत.पण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे.त्याला पर्याय डिजिटल शिक्षण,विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणामुळे काॅम्प्युटर,लॅपटाॅप,पॅड,टॅबलेट इत्यादी हाताळता येत आहे;पण ज्याचा पोटासाठी संघर्ष आहे तो डिजिटल शिक्षणासाठी स्मार्टफोन कोठून आणणार ? शाळेत सर्व स्तरातील मुलं असतात प्रत्येकाला ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य होईलच असे नाही.
वर्तनात परिवर्तन म्हणजे शिक्षण पण आज या शिक्षणपद्धतीमुळे मुले एकलकोंडी बनत चालली आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे इंटरनेटचा गैरवापर,सायबर क्राईम इत्यादी गोष्टींची शक्यता नाकारता येत नाही.तसेच मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.नैतिक मुल्यांची जोपासना या शिक्षणाद्वारे होऊ शकत नाही.शिक्षण एका वर्गात असते तर विद्यार्थ्यामध्ये एकोप्याची भावना मैत्री,बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, मिळून-मिसळून राहण्याची वृती हे गुण विकसित होतात.तसेच काही विषय हे मुक्त वातावरणात शिकवले गेले पाहिजेत जसे की,शारीरिक शिक्षण,पर्यावरण इत्यादी ऑनलाईन शिकवण्यात अडचणी येतात,मैदानावरील अनुभव निसर्ग सान्निध्याचा आनंद घेता येत नाही.वास्तव अन् कल्पना यात ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षकांना बरीच मेहनत करावी लागते.नवनवीन प्रयोगिक तत्वावर आधारित उपक्रम राबवावे लागतात त्यात शिक्षकांचा कसब लागतो.

सय्यद सादिया याकुबसाहेब ( सहशिक्षक ) डाॅ.जाकीर हुसेन विद्यालय,कोल्हे नगर,लातूर

संस्काराची सर या ऑनलाईन पद्धतीने होणे नाही

ऑनलाईन पद्धतीने काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत.त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पण मला वाटते की शिक्षक आणि विध्यार्थी यांच्या नात्यातले वाढलेले अंतर.हे ऑनलाईन शिक्षण विध्यार्थ्यांच्या किती पचनी पडत आहे.हे मूल्यमापन करणे फारच अवघड बाब झाली आहे. दिलेला गृहपाठ विद्यार्थी करतात पण त्यामध्ये एक कृत्रिम पणा आल्याचे मला वाटत आहे.शाळेच्या वातावरणात बालमनावर संस्काराची सर या ऑनलाईन पद्धतीने होणे नाही.

मिरगुडे.एस.पी.(सहशिक्षक) महाराष्ट्र विद्यालय प्राथमिक शाळा औराद शहाजानी. ता निलंगा जि लातूर.

विवेकशून्य पिढी घडवण्याचे कार्य तर करत नाहीत ना अशी भीती वाटत आहे. आज छोट्याश्या विषाणूने त्याच्या विळख्यात असणारे आणि आपण गृहीत धरलेले जग हादरवून सोडले आहे.ताळेबंदी, सामाजिक अंतर आशा तांत्रिक पद्धतीचा वापर करूनही आपण त्यावर विजय मिळवण्यात कुठं तरी कमी पडलो,असेच वाटत आहे.हे असताना शिक्षण मूलभूत अधिकार आणि बालकांचा हक्क म्हणून केवळ केविलवाने प्रयत्न करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे योग्य की अयोग्य हा मोठा यक्ष प्रश्न सर्वांच्या समोर उभा आहे.या गोंधळलेल्या क्षणी शिक्षणाचा मुख्य उद्देश आणि अर्थ समजून घेणे सोडून आपण योग्य अँप्स कोणती ? शिक्षण पोहचवण्यास कोण कोणत्या तांत्रिक बाबींचा वापर करावा यातच अडकून पडलो.हे करणे म्हणजे आपण आमच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाहीत हे कृत्रिमरीत्या दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नच केला असे वाटते.
आधीच तंत्रज्ञान आणि मोबाईल मुळे एकलकोंडी झालेली मुले आपण परत त्याच राक्षसाच्या स्वाधीन केली. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध हे खरे असेल तर वाघिणीचे दूध असे 17 कोस दूर राहून बालकांना कसे देत असाल याचे आश्चर्यच आहे.मी देखील एक शिक्षक म्हणून याचा विचार करताना हे मनाला रुचनारे नाही.फक्त शैक्षणिक वर्ष पूर्ण करणे हा एकमेव उद्देश ठेऊन दिले जात असणारे शिक्षण म्हणजे कृत्रिम बुद्धिमतेची विवेकशून्य पिढी घडवण्याचे कार्य तर करत नाहीत ना अशी भीती वाटत आहे.

विज्ञानाची कास धरूया ! भारत देश उज्जवल करूया असे म्हणत आपण देश उच्चतम पातळीवर घेऊन गेलो असलो तरी भाकरी साठी वनवनत फिरणारे,दमडीच्या शोधात हातावर पोट घेऊन चालणारे आणि ग्रामीण भागात राहणारे भारताचे भविष्य दुर्लक्षित होत आहे याची जाणीव आपण ठेवायलाच हवी. मध्यमवर्गीय कुटुंबातील बारा वर्षाच्या एका मुलाला टाळेबंदीमुळे एका लहान खोलीत अस्वस्थ आणि गुदमरल्यासारखे वाटत असूनही ऑनलाइन अध्यापन पुढे जाणे आवश्यक असल्यामुळे त्याला कुटुंबात उपलब्ध असलेला एकमेव स्मार्टफोन वापरून मिळत असलेलं वरवरचं शिक्षण देण्याची घाई करून आपण त्याच शिकण्याच स्वप्न संकुचित केलंय असच वाटत.आजच्या पिढीला रवींद्रनाथ टागोर यांना अभिप्रेत असणार निसर्गातील शिक्षण देऊया..आणि भारत देश उज्जवल बनवूया.

श्री.उदय कुलकर्णी. जि.प.प्राथमिक शाळा,धाऊलवल्ली न २, ता.राजापूर,जि.रत्नागिरी

ग्रामीण भागात खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शिक्षण म्हणजे विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास.शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्वांत महत्वाचे दोन घटक म्हणजे विध्यार्थी व शिक्षक.आज शिक्षण प्रक्रिया कोरोना महामारीमुळे शाळा बंद पण शिक्षण आहे.ह्या सदराखाली ऑनलाईन शिक्षण चालू आहे.ही प्रणाली राबविताना ग्रामीण भागात खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आज 35 ते 40% पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. त्यापैकी बरेच पालक मोबाईल ही किमती वस्तू असल्यामुळे आपल्या पाल्यांना ते नेहमी वापरण्यास देत नाहीत.अनेक पालकांना रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत.मोबाईल घेण्यासाठी पैसे नाहीत.असे सांगतात त्यापैकी अनेक पालकांना अँप डाउनलोड करणे,लिंकला टच करून पाहणे इ.गोष्टी सांगाव्या लागतात.अनेक विध्यार्थी दिलेला अभ्यास करत नाहीत काही विध्यार्थी हा अभ्यास करतात. एकंदरीत सर्वांसाठी शिक्षण शिक्षणसाठी सर्व हे साध्य होण्यासाठी ऑनलाईन शिक्षण तोडके पडत आहे असे वाटते. शेवटी दोन सजीव घटकांचा संवाद हा महत्वाचा असतोच.तो ह्या अभासी ऑनलाईन वर्गातून निश्चितच साध्य होताना दिसून येईल ह्याची खात्री देता येत नाही पण आमचा प्रयत्न चालूच राहील.

शेख.एच.आय. जि.प.कासारगाव ता.जि.लातूर

दत्तात्रय येरमुळे 9359642372

लेखक स्वतः डी.एड.पदवीधारक आहेत.

लिखते रहो
व्हिडीओ