img
img
Share On Facebook

अहमदनगर:वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर १५ दिवसात गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना या प्रकरणी अंनिसने नोटीस बजावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी तपास करण्यात कसूर केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. तसंच या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारवाई केली नाही तर कोर्टात जाणार असल्याचाही इशारा अंनिसने दिला आहे. इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ओझर या ठिकाणी केलेल्या किर्तनाचा तो व्हिडीओ होता. त्यामध्ये त्यांनी ‘सम तिथीला स्त्री संग झाल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग झाल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर बराच वाद निर्माण झाला. PCPNDT अन्वये त्यांना नोटीसही बजावण्यात आली. दरम्यान यासंदर्भात इंदुरीकर महाराजांना विचारलं असता दोन तासांच्या किर्तनात अशी चूक होऊ शकते. घडल्या गोष्टीचा मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. आता वाद शमला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसंच काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर हा वाद शमला असं वाटलं होतं. मात्र आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लावून धरली आहे.

देश-विदेश = राज्य
व्हिडीओ