img
img
Share On Facebook

रेणापूर /प्रतिनिधी: रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी स्थगिती दिली .नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाणी पिण्यासाठी पुरेल असे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. संबंधित यंत्रणेने प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचेही त्यांनी आदेशित केले . तालुक्यातील घनसरगाव येथील काही शेतकऱ्यांनी पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी करून आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावरून पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची तयारी चालवली होती .हे लक्षात घेता रेणापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या नेतृत्वात नगरसेवक आणि रेणापूरसह परिसरातील गावच्या नागरिकांनी मागच्या तीन दिवसांपासून रेणा प्रकल्पाच्या दरवाजासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते .गुरुवारी तहसीलदारांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत माघार घेण्याची विनंती केली होती .परंतु ग्रामस्थांनी ती फेटाळत आंदोलन सुरूच ठेवले होते. या प्रश्नामुळे रेणा प्रकल्पाच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती .रेणापूरकरांनी ही व्यापारपेठ बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.त्यामुळे शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आंदोलनकर्ते आणि पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले .बैठकीला उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपलब्ध पाणीसाठ्याची माहितीही घेतली.जुलैअखेरचे नियोजन केले असता थोडेफार पाणी सोडता येईल असे मत अधिकाऱ्यांनी मांडले .दरम्यानच्या काळात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा जिल्हाधिकार्‍यांना दूरध्वनी आला .यावेळी बोलताना आयुक्तांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे.शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. पर्यावरणातील बदलानुसार जुलैपर्यंत पाऊस पडत नाही. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल याची काळजी घ्या ,असे ते म्हणाले .यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला साठ्याची माहिती मागितली. ऑक्टोबर पर्यंतचा विचार करता सध्या प्रकल्पातून पाणी सोडता येणार नाही ,असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आजघडीला भंडारवाडी प्रकल्पात उपलब्ध असणारा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले .याशिवाय महसूल व पाटबंधारे विभागाने प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले .तीन दिवस केलेल्या आंदोलनानंतर आता भंडारवाडीतून पाणी सोडले जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलन मागे घेणार असल्याचे रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले . दरम्यान तीन दिवस प्रकल्पाच्या दरवाजासमोर केलेल्या आंदोलनानंतर पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यामुळे आंदोलनकर्त्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. उपनगराध्यक्ष आकनगिरे यांच्यासह नगरसेवक आणि नागरिकांनी यावेळी भंडारवाडी प्रकल्पात जलपूजन केले .

सायन्स टेक
व्हिडीओ