img
img
Share On Facebook

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्या शाहीन बाग परिसरात कलम १४४ हे जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे. शाहीन बाग परिसरात कुणीही एकत्र जमू नये, तसेच कुणीही आंदोलन करु नये असे दिल्ली पोलिसांनी नोटीशीद्वारे बजावले आहे. हा आदेश न मानल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शाहीन बागेत गेल्या अडीच महिन्यांपासून महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा अशी या महिलांची मागणी आहे. शाहीन बाग परिसरात जमावबंदीचा आदेश दिल्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रविवारी हे आंदोलन संपवण्यात येईल अशी घोषणा हिंदू सेनेने केली होती. हिंदू सेनेने या संदर्भात एक ट्विट केले होते. त्यात रविवारी १ मार्च या दिवशी शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यात येईल असे म्हटले होते. त्यानंतर शाहीन बागेत मोठ्या संख्यने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांनी आपले आंदोलन आता थांबवावे असे आवाहनही पोलिसांनी आंदोलकांना केले आहे.दिल्ली पोलिसांना शाहीन बागेत सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असे ट्विट हिंदू सेनेचे नेते विष्णु गुप्ता यांनी केले. भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १९ आणि २१ अंतर्गत तेथे सर्वसामान्. लोकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिंदू सेना १ मार्च २०२० या दिवशी सकाळी १० वाजता सर्व राष्ट्रवादींना अडवण्यात आलेल्या रस्ते मोकळे करण्यासाठी आमंत्रित करत आहे, असेही हिंदू सेनेने जाहीर केले आहे. पोलिसांनी शाहीन बाग परिसराला बॅरिकेड्सनी वेढले आहे. त्याच प्रमाणे इथे सीआरपीसीचे कलम १४४ लागू करण्यात आल्याने आता इथे आंदोलन करण्याची कुणालाही परवानगी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. १५ डिसेंबर २०१९ पासून शाहीन बाग परिसरातील रस्ते बंद आहेत. इथे तेव्हापासून सीएए विरोधात आंदोलन सुरू आहे.

सायन्स टेक
व्हिडीओ