img
img
Share On Facebook

मुंबई : चीनमधून निष्पन्न झालेल्या करोना विषाणूने जगाला कवेत घेतले असून आतापर्यंत सहा हजार जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका विमान कंपन्यांना बसला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून अनेक देशांनी हवाई सेवेला रोख लावली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचे दररोज प्रचंड नुकसान होत आहे. सरकारने वेळीच मदत केली नाही तर जगभरातील विमान कंपन्या पुढील दोन महिन्यात दिवाळखोरीत जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ग्लोबल एव्हिएशन कन्सल्टन्सी 'CAPA'ने विमान कंपन्यांच्या आर्थिक डबघाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने युरोपातील प्रवाशांवर प्रवेश बंदी लागू केली आहे. त्याचा मोठा फटका हवाई सेवेला बसला आहे. करोनामुळे हवाई प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात घसरली आहे. त्यामुळं कंपन्यांनी सेवेत कपात केली आहे. अटलांटाची आघाडीची विमान कंपनी असलेल्या डेल्टा एअरलाइन्सने ४० टक्के सेवा रद्द केली असून ३०० विमाने पार्किंगमध्ये ठेवण्यात आली आहे.
ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहिली किंवा सरकारांनी त्यांच्या देशातील विमान कंपन्यांना आर्थिक मदत केली नाही तर मे महिन्याअखेर जगभरातील अनेक विमान कंपन्या दिवाळखोरीत जातील, अशी भीती 'CAPA'ने व्यक्त केली आहे.
भारतातील इंडिगोनेही गुरुवारपासून विमान सेवेत १५ ते २० टक्के कपात केली आहे. विमान कंपन्यांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यांच्याकडील रोकड कमी होत असून त्यांना मदतीसाठी काही उपाययोजना झाली नाही तर कंपन्या डबघाईला जातील, असे या संघटनेने म्हटलं आहे.
करोनामुळे जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय विमान देणाऱ्या कंपन्यांनी चीनची विमान सेवा पूर्णपणे खंडीत केली आहे. त्याचबरोबर आता देशांतर्गत हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. निम्म्याहून अधिक आसने भरली जात नसल्याने कंपन्या उड्डाणे रद्द करत आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) मते करोना व्हायरसमुळे आशिया-प्रशांत प्रांतात विमान प्रवाशांच्या संख्येत १३ टक्के घसरण झाली आहे. यामुळे येथील विमान कंपन्यांना जवळपास २७.८ अब्ज डॉलर्सचे नुकसान होणार आहे.

पैसा बोलता है
व्हिडीओ