img
img
Share On Facebook

जळकोट : हाळद वाढवणा (ता.जळकोट) येथे शेतातील पाईप गोळा करत असताना गोठ्याच्या बाजूस उभे असलेले खांबावरुन खाली पडलेल्या विजेच्या ताराला स्पर्श होऊन दोघा सख्ख्या भावांचा गुरुवारी (ता.११) सकाळी दहा वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली. हाळद वाढवणा येथील परमेश्वर संजय दहिफळे (वय २६) व कपिल संजय दहिफळे (वय २२) हे सकाळी दहाच्या सुमारास शेतात गेले होते. दोन्ही भाऊ एकामागे एक पईप गोळा करीत होते. शेतातील गोठ्याच्या बाजूला महावितरणचे विद्युत खांब होते. खांबाचा आर्थिंग दिलेला तार तुटून पडला होता. या दोन्ही भावाला माहिती नव्हते. समोर असलेला मोठा भाऊ परमेश्वरच्या आधी हाताला तार स्पर्श झाला आणि तो तारालाच चिटकून बसला. पाठीमागे असलेला कपिल याने घाईघाईने लाकूड घेऊन भावाला तारापासून दुर करण्याचा प्रयत्न केला. हातातील लाकूड ओले असल्यामुळे त्यालाही विजेचा धक्का लागला आणि काही क्षणातच दोन्ही भावाचा जागेवर मृत्यू झाला.सदरील घटनेची माहिती हाळदवाढवणा येथील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी शेताकडे जाऊन विद्युत प्रवाह बंद करुन त्या दोन भावांना बाजूला काढले. सदरील घटनेची माहिती गावातील रामेश्वर पाटील यांनी जळकोट पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, पोलिस जमादार प्रकाश चिमणदरे यांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. सदरील घटना हि महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप त्यांच्या कुंटुबीयांनी केला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहिण असा परिवार आहे. हाताला आलेली दोन मुले निघून गेल्याने आई, वडीलांना धक्का बसला आहे. गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात या दोन भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लातूर
व्हिडीओ